कोलंबो - आपल्या भेदक वेगवान गोलंदाजीने चाहत्यांची मने जिंकणारा लसिथ मलिंगा आज होणाऱ्या बांगलादेशविरुध्दच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. त्याला विजयी निरोप देण्यासाठी श्रीलंकेचा संघ फार उत्सूक आहे.
मलिंगाने आपल्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत २२५ सामने खेळले असून ३३५ बळी घेतले आहेत. तर, कसोटीमध्ये तो ३० सामने खेळला असून, १०१ बळी आपल्या नावावर केले आहेत. टी-२० कारकिर्द सांगायची झाली तर मलिंगाने ७३ सामन्यांमध्ये लंकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामध्ये त्याने ९७ बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांमध्ये मुथय्या मुरलीधरनने ५२३ बळी घेतले आहे तर, त्याच्या मागोमाग चामिंडा वासने ३९९ बळी, तर ३३५ बळी घेणारा मलिंगा लंकेचा तिसरा गोलंदाज ठरला आहे.
मलिंगाच्या निवृत्तीनंतर त्यांची संघातील उणीव भरून काढण्याचे आव्हान श्रीलंकेच्या संघासमोर उभे राहणार आहे. मलिंगा आपल्या निवृत्तीबाबत म्हणाला, 'माझ्या या निर्णयाने अनेक नवीन युवा खेळाडूंना संधी मिळेल, याचा मला आनंद होत आहे.' मलिंगा निवृत्तीनंतर, ऑस्ट्रेलियाचे कायमस्वरूपी नागरिकत्व घेणार असून त्याच्या कुटुंबासह तो तेथेच स्थायिक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.