अबुधाबी - आयपीएलमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात कोलकाताने पंजाबला २ धावांनी पराभूत केले. कर्णधार केएल राहुल (७४) व मयंक अग्रवाल (५६) यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावत पंजाबने सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली होती. पण केकेआरच्या गोलंदाजांनी अखेरच्या तीन षटकात टिच्चून मारा करत सामना जिंकला. हा पंजाबचा सलग पाचवा पराभव होता. या पराभवानंतर राहुलने आपली प्रतिक्रिया दिली.
सामन्यानंतर पुरस्कार वितरण समारंभात राहुल म्हणाला, "माझ्याकडे उत्तर नाही. पुढच्या सात सामन्यांत आम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आम्ही चमकदार गोलंदाजी केली. आमच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये धैर्याने गोलंदाजी केली."
राहुल म्हणाला, "या सामन्यात धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आम्ही कधीच समाधानी नव्हते. आपण सामना जिंकला तेव्हाच आपण समाधानी होता. शेवटी आम्ही सतत विकेट गमावत राहिलो."
कोलकाताने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबने सावध सुरूवात केली. पंजाबच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. मात्र, हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर कोलकाताचे गोलंदाज पंजाबच्या फलंदाजांवर वरचढ ठरले. शेवटी पंजाबने हा सामना २ धावांनी गमावला.