साउथम्प्टन - इंग्लंडविरुद्धचा एजेस बाउलवर मिळवलेला विजय हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या विजयांपैकी एक असल्याचे वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने म्हटले आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कोरोनानंतर सुरू होणारी ही पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी मालिका आहे.
कर्णधार होल्डरने सामन्यानंतर सांगितले, "हा आतापर्यंतच्या सर्वोत्तम विजयांपैकी एक विजय आहे. काल एक कठीण दिवस होता. दिवस मोठा होता आणि गोलंदाज सतत गोलंदाजी करत होते. जर काल आम्हाला विकेट मिळाल्या असत्या तर आमचे काम आणखी सुकर झाले असते, पण आम्ही पुनरागमन केले."
कोरोनानंतर खेळण्याविषयी होल्डर म्हणाला, "आम्हाला खेळायची संधी मिळाली पण मानसिकदृष्ट्या आम्हाला कधीच खात्री नव्हती. परंतु इच्छाशक्ती खूप होती. आमचे काय धोक्यात आहे हे आम्हाला माहित होते. "
होल्डरने संघाच्या विजयाचा नायक जर्मेन ब्लॅकवुडची प्रशंसा केली. तो म्हणाला, "त्याची खेळी शानदार होती. जेव्हा तो बाद झाला तेव्हा मी खूप निराश झालो होतो. तो असेच खेळतो. तो नेहमीच प्रयत्न करतो आणि त्याचा दिवस होता." ब्लॅकवुडने 95 धावांची आश्वासक खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला. त्याने या खेळीत 12 चौकार लगावले.