नवी दिल्ली - सनरायझर्स हैदराबादने एलिमिनेटर सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ६ गडी राखून पराभव करत बंगळुरुचे पुन्हा एकदा स्वप्न भंगवले. विजयासाठी दिलेले १३२ धावांचे हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केले. दरम्यान बंगळुरुच्या पराभवानंतर, कोलकाता संघाला दोन वेळा विजेतेपद जिंकून देणारा कर्णधार गौतम गंभीरने, आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. त्याने, आता वेळ आली आहे जेव्हा बंगळुरूला कर्णधारपदासाठी विराट कोहलीच्या पुढे विचार करावा लागेल. जर आपण बंगळुरूच्या संघ व्यवस्थापनामध्ये असतो तर विराटला कर्णधारपदावरून हटवले असते, असे म्हटले आहे.
काय म्हणाला गंभीर
एका क्रीडा संकेतस्थळाला गंभीरने मुलाखत दिली. यात त्याला तुम्ही जर फ्रेन्चायझीचे प्रभारी असता तर संघाचा कर्णधार बदलला असता का? असा सवाल विचारला. यावर गंभीर म्हणाला, १०० टक्के, समस्या उत्तर देण्यात आहे. कोणत्याही स्पर्धेत आठ वर्ष हा मोठा कालावधी असतो. कर्णधाराच्या बाबतीत विसरून जा. पण कोणताही असा खेळाडू सांगा जो आठ वर्ष झाली असेल आणि एकदाही स्पर्धेचे विजेतेपद पटकावले नाही. एका कर्णधाराला उत्तर देणे आवश्यक आहे. ही केवळ या वर्षाची गोष्ट नाही.'
विराटच्या विरोधात नाही पण...
मी विराटच्या विरोधात नाही. पण कुठे ना कुठे त्याला पराभवासाठी मी जबाबदार आहे असे म्हणत जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे सांगितले. याविषयावर गंभीरने अश्विनचा दाखला दिला. त्याने सांगितले की, किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये अश्विनची कामगिरी चांगली झाली नाही, त्यानंतर त्याला हटवण्यात आले. आपण धोनीच्या, रोहितच्या बाबत चर्चा करतो. परंतु विराट कोहलीबाबत बिलकुल बोलत नाही, असेही गंभीर म्हणाला.
....तर रोहितला देखील हटवण्यात आलं असतं
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चार वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. त्याने जर आठ वर्षांपर्यंत स्वत:ला सिद्ध केले नसते तर त्यालाही हटवण्यात आले असते याची मला खात्री आहे. व्यक्तीनुरुप गोष्टी असू नये, असेही गंभीरने सांगितले.