मुंबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. आज स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाईल, असे आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितलं आहे. स्पर्धेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. असे असताना आतापर्यंत ७ खेळाडूंनी विविध कारणावरुन स्पर्धेतून माघार घेतली आहे. यात महत्वाच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामुळं करोडो रुपयांची बोली लावून आपल्या संघात घेतलेल्या फ्रेंचायझींसमोर अडचणी वाढल्या आहेत. वाचा कोण आहेत ते खेळाडू -
ख्रिस वोक्स (दिल्ली कॅपिटल्स) -
दिल्ली कॅपिटल्स संघाने ख्रिस वोक्सला आपल्या संघात घेतले होते. पण त्याने व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे. यामुळं दिल्ली संघाने त्यांच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज एनरिक नॉर्खिया याचा समावेश केला आहे.
जेसन रॉय (दिल्ली कॅपिटल्स) -
ख्रिस वोक्सनंतर जेसन रॉयने स्पर्धेतून माघार घेत दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का दिला. इंग्लंडचा स्फोटक सलामीवीर जेसन रॉयला मँचेस्टर येथे सराव करताना दुखापत झाली. यामुळं त्याने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेत माघार घेतली. त्यानंतर तो आयपीएलमधूनही बाहेर पडला. दिल्लीने रॉयच्या जागेवर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनिअर सॅम्सला संघात घेतले.
हॅरी गर्नी (कोलकाता नाइट रायडर्स) -
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी याला कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या संघात घेतले. पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याने आयपीएल २०२० मध्ये न उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान केकेआरने हॅरीच्या जागेवर रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा केली नाही. पण बांगलादेशचा गोलंदाज मुस्तफिजूर रेहमानसाठी केकेआर आग्रही होती. पण रेहमाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयपीएल खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं नाही.
सुरेश रैना (चेन्नई सुपर किंग्ज) -
चेन्नई सुपर किंग्ज संघाला सुरेश रैनाने मोठा धक्का दिला. आयपीएल २०२० खेळण्यासाठी रैना युएईमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याने अचानक आयपीएलमधून माघार घेतल्याचे सांगत भारतात परतणे पसंत केले. चेन्नईने त्याला ११ कोटी रुपयात आपल्या संघात घेतले होते. अद्याप चेन्नईने रैनाच्या जागेवर रिप्लेसमेंट खेळाडूची घोषणा केलेली नाही.
केन रिचर्डसन (रॉयल चॅलेजर्स बंगळुरू) -
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज केन रिचर्डसन याला आरसीबीने ४ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले होते. पण रिचर्डसने पत्नी गरोदर असून या काळात तो आयपीएल खेळणार नसल्याचे जाहीर केले. आरसीबीने रिचर्डसनच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्याच अॅडम झम्पाची निवड केली आहे.
लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स) -
मुंबई इंडियन्ससाठी महत्वाचा असलेल्या लसिथ मलिंगाने आयपीएल २०२० मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्याने व्यक्तिगत कारणमुळं हा निर्णय घेतल्याचे व्यवस्थापनाला कळवलं. मुंबईने मलिंगाच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या जेम्स पॅटिन्सला संघात घेतलं आहे.
हरभजन सिंग (चेन्नई सुपर किंग्ज) -
हरभजन सिंगने आईच्या उपचारासाठी आयपीएल २०२० मध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. चेन्नईने त्याला २ करोड रुपये देत आपल्या संघात घेतलं होतं. अद्याप चेन्नईने हरभजनच्या जागेवर रिप्लेसमेंट जाहीर केलेला नाही.