दुबई - आयपीएल २०२०चा अंतिम सामना ४ वेळचा विजेत्या मुंबई इंडियन्स आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाणार आहे. या सामन्याआधी भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू आणि मुंबईकर सचिन तेंडुलकरने मुंबईच्या संघासाठी एक खास संदेश दिला आहे.
मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. केवळ संघ व्यवस्थापन काम करत नाही तर संघ मालक आणि फॅन्स देखील मुंबईला सपोर्ट करत आहेत, असे सचिन या व्हिडिओत सांगताना दिसतो.
सर्वच तुमच्या पाठीशी..
सचिन म्हणाला की, 'जेव्हा तुम्हाला माहीत आहे की, मालकापासून सपोर्ट स्टाफ आणि सर्वजण तुमच्या पाठीमागे आहेत आणि जेव्हा तुम्ही मुंबईसाठी खेळण्यासाठी जाता तेव्हा तुम्ही एकटे नसता. तुमच्यासोबत पूर्ण ताफा उभा राहतो. ते तुमच्याकडून बेस्ट काढून घेतात, तसेच ते सर्व गोष्टी करतात, ज्यामुळे तुम्ही मोठ्या पातळीवर परफॉर्म करू शकाल.'
आव्हान पेलण्यासाठी एकजूट
सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे, हा एक परिवार आहे. खेळ असो जीवन यात चढ-उतार तर येतच राहतात. तसेच अनेक आव्हाने येतात. पण आम्ही सर्वजण एकजूट राहतो. खासकरून आयपीएलमध्ये. कारण ही स्पर्धा वेगाने पुढे जाते. यासाठी एकजूट असणे आवश्यक ठरते. सर्वजण मजबुतीने एकजूट राहावे आणि यात आम्ही यशस्वी देखील ठरलो आहे, असे देखील सचिनने सांगितले.
मुंबईने तब्बल ४ वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. आता त्यांची नजर पाचव्या विजेतेपदावर आहे. तर दुसरीकडे पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या दिल्लीचा संघ पहिल्यांदा विजेतेपद आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे.
हेही वाचा - ...म्हणून आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र नव्हतो, डेव्हिड वॉर्नरची कबुली
हेही वाचा - Women's T२० Challenge : सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात जेतेपदासाठी झुंज