दुबई - बेन स्टोक्सच्या पुनरागमनानंतर राजस्थान रॉयल्स संघ आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्यांच्या मागील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीने रॉयल्सला ४६ धावांनी पराभूत केले. स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्त्वाखालील रॉयल्स संघ दिल्लीपुढे मोठे आव्हान उभे करू शकतो. दुबईच्या मैदानावर हा सामना सायंकाळी साडेसात वाजता सुरू होईल.
इंग्लंडच्या स्टोक्सला आपल्या पहिल्या सामन्यात चुणूक दाखवता आली नाही. मात्र, त्याच्या उपस्थितीत संघाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजय नोंदवला आहे. त्यामुळे राजस्थानचा आत्मविश्वास दुणावला आहे. स्मिथ आणि संजू सॅमसन यांना हंगामातील पहिल्या दोन सामन्यांमधील सातत्य कायम राखता आले नाही. राजस्थानला आघाडीची फळी निश्चित करण्याची नितांत आवश्यकता आहे. जोस बटलरने मुंबई इंडियन्सविरुद्ध ४४ चेंडूंत ७० धावांची खेळी साकारली. पण तोही मागील दोन सामन्यांत अपयशी ठरत आहे. जोफ्रा आर्चरच्या नेतृत्वाखालील राजस्थानच्या गोलंदाजीच्या माऱ्यात तेवतिया आणि श्रेयस गोपाल यांच्यावर फिरकीची मदार असेल.
दुसरीकडे, दिल्लीने याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करला आहे. मात्र, शिखर धवनला गवसलेला सूर ही संघासाठी चांगली बाब आहे. पृथ्वी शॉ आणि अय्यर सातत्याने धावा करत आहेत. परंतू यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे आठवडाभर खेळू शकणार नसल्याने ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी जाऊ शकेल. आज अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळू शकते.
दिल्लीकडे आक्रमक गोलंदाजही आहेत. कगिसो रबाडाच्या नेतृत्वात त्यांची गोलंदाजी मजबूत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एनरिच नॉर्ट्जे आणि हर्षेल पटेलचा चांगला पाठिंबा असलेल्या रबाडाने आतापर्यंत १७ बळी मिळवले आहेत. रविचंद्रन अश्विननेही अक्षर पटेलबरोबर चांगली गोलंदाजी केली आहे.
राजस्थान रॉयल्स -
जोस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अँड्र्यू टाय, कार्तिक त्यागी, स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाल, राहुल तेवतिया जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, महिपाल लोमरोर, ओशाने थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंग, वरुण आरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी, जोफ्रा आर्चर.
दिल्ली कॅपिटल्स -
श्रेयस अय्यर (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, अजिंक्य रहाणे, अमित मिश्रा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, संदीप लामिछाने, किमो पॉल, डॅनियल सॅम, मोहित शर्मा , एनरिच नॉर्ट्जे, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), आवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, मार्कस स्टॉइनिस, ललित यादव.