दुबई - भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे. मागील रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित दुखापतग्रस्त झाला. यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्याविरूद्ध झालेल्या सामन्यात मैदानात उतरला नव्हता. अशात ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात रोहित शर्माला स्थान मिळाले नाही. रोहितची दुखापत गंभीर असून तो आयपीएलमधूनही माघार घेईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या चर्चा सुरू असताना मुंबई इंडियन्सने रोहितच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले आहेत.
काय झाले रोहितला -
किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात विश्रांती घेतली होती. त्यापाठोपाठ राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही तो खेळला नाही.
काय आहे रोहितच्या दुखापतीचे अपडेट -
रोहित दुखापतीतून सावरला आहे. त्याने सोमवारी नेट्समध्ये कसून सराव देखील केला. मुंबई इंडियन्सने त्याच्या सराव करतानाचे फोटो आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केले आहेत.
रोहितच्या दुखापतीवर काय म्हणाला क्विंटन डी कॉक -
हिटमॅन रोहित शर्माचा सहकारी सलामीवीर खेळाडू क्विंटन डी कॉकने सांगितले की, रोहितची दुखापत रिकव्हर होत आहे. पण तो कधी संघात वापसी करेल, हे सांगणे कठीण आहे. रोहित लवकरच यातून बाहेर पडेल आणि मैदानात संघासोबत दिसेल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड -
दरम्यान, आयपीएल २०२० स्पर्धा संपल्यानंतर भारतीय संघ या वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया, तीन टी-२० सामने, तीन एकदिवसीय सामने आणि चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकदिवसीय, टी-२० आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी ‘हिटमॅन’ रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलेले नाही, पण आयपीएलमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आली आहे. शुबमन गिल व कुलदीप यादवला टी-२० संघात स्थान मिळालेली नाही, तर श्रेयस अय्यर, शिखर धवन, हार्दिक पांड्या व युझवेंद्र चहल यांना कसोटी संघात स्थान मिळालेले नाही.