मुंबई - आयपीएलच्या १३व्या हंगामाचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात १९ सप्टेंबरला रंगणार आहे. त्याआधी मुंबई इंडियन्स संघाकडून सलामीला कोण उतरणार? याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यावर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने महिती दिली आहे.
मुंबई इंडियन्स संघात यंदा रोहित शर्मा, क्विंटन डी-कॉक आणि ख्रिस लीन असे ३ मातब्बर सलामीवीर खेळाडू आहेत. यामुळे सलामीला कोणत्या जोडीला पसंती द्यायची, हा प्रश्न मुंबईच्या संघ व्यवस्थापनासमोर होता. तेव्हा कर्णधार रोहित शर्माने आपण सलामीला येणार असल्याचे जाहीर केले आहे. सलामीच्या सामन्याआधी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स दरम्यान सलामीबाबत विचारलेल्या प्रश्नावर रोहितने याबद्दलची माहिती दिली.
रोहित म्हणाला, मी मागील आयपीएलच्या हंगामात संपूर्ण स्पर्धेत सलामीला उतरलो होतो. यामुळे यंदाच्या हंगामात देखील मीच सलामीला येईन. पण संघाला जशी गरज असेल तसे सर्व पर्याय मी खुले ठेवणार आहे. एखाद्या सामन्यात प्रयोग करायचा ठरल्यास ख्रिस लीन किंवा ईशान किशन यासारख्या खेळाडूंना सलामीला संधी देण्यात येईल.
दरम्यान, क्विंटन डी-कॉकसोबत ख्रिस लीनला संधी दिली जाणार की रोहित शर्मा उतरणार या चर्चांनी ऊत आला होता. पण रोहितने यावर उत्तर देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा आयपीएल हंगाम यूएईमध्ये खेळला जात आहे. यात कोणता संघ बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - ENG vs AUS : मॅक्सवेल-कॅरीने खेचून आणला अशक्यप्राय विजय; ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय