अबुधाबी - गतविजेत्या मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या तेराव्या हंगामात पराभवाने सुरूवात झाली. सलामीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला ५ गडी राखून धूळ चारली. हा सलग आठवा हंगाम ज्यात मुंबई इंडियन्सची सुरुवात पराभवानेच झाली आहे. चार वेळा विजेता असलेल्या मुंबईची ही हाराकिरी २०२०मध्येही कायम राहिली. 2013च्या आयपीएलपासून मुंबईने सलामीचा सामना कधीच जिंकलेला नाही.
मागील सात वर्षांपासून सलामीचा सामना गमावत आलेला मुंबई इंडियन्सचा संघ २०२०मध्ये तरी विजयी होणार का? याची उत्सुकता चाहत्यांना होती. पण चेन्नईने दमदार खेळ करत मुंबईचा पराभव केला आणि मुंबईची सलामीचा सामना गमावण्याची मालिका कायम राहिली. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले.
रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आक्रमक सुरूवात केली. पण लेगस्पिनरसमोर नेहमीच अडखळणाऱ्या रोहितला आज पीयूष चावला या चेन्नईच्या लेगस्पिनरने बाद केले. दुसरा सलामीवर क्विंटन डी कॉकला मात्र चांगला सूर सापडला होता, पण तोही आशा निर्माण करून बाद झाला. मधल्या फळीतील सौरभ तिवारी (४२), हार्दिक पांड्या (१४) आणि पोलार्ड (१८) यांनी केलेल्या धावांमुळे मुंबईला कशीबशी १६२ धावांपर्यंत मजल मारता आली.
१६२ धावा करणाऱ्या मुंबईने चेन्नईची २ बाद ६ अशी अवस्था केली होती, परंतु त्यानंतर अंबाती रायडू आणि फाफ डू प्लेसिस यांनी या तिसऱ्या गड्यासाठी ११५ धावांची भागिदारी करत सामना चेन्नईच्या बाजूने फिरवला. फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर, अंबाती रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे चेन्नईने विजय साकारला.
आयपीएलमध्ये २०१३पासून सलामी सामन्यात मुंबईचे झालेले पराभव
- २०२० – चेन्नईने पाच गडी राखून केला मुंबईचा पराभव
- २०१९ – दिल्ली संघाने ३७ धावांनी मुंबईवर विजय मिळवला
- २०१८ – चेन्नईने मुंबईचा एक गडी राखून केला पराभव
- २०१७ – पुणे संघाने सात गडी राखून केला मुंबईचा पराभव
- २०१६ – पुण्याने मुंबईचा ९ गडी राखून केला पराभव
- २०१५ – कोलकाता संघाने सात गडी राखून केला मुंबईचा पराभव
- २०१४ – कोलकाता संघाने मुंबई संघाचा ४१ धावांनी केला पराभव
- २०१३ – आरसीबीने दोन धावांनी मुंबईवर मिळवला विजय