अबुधाबी - चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा १३ वा हंगाम खराब ठरला. कारण ते प्ले ऑफ फेरी गाठू शकले नाहीत. आज चेन्नई पंजाबविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळत आहे. हा सामना त्यांच्यासाठी केवळ औपचारिकता आहे. या सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान, डॅनी मॉरिसन यांनी धोनीला विचारले की, चेन्नई सुपर किंग्जकडून हा तुझा अखेरचा सामना आहे का? त्यावर धोनीने दोन शब्दात भन्नाट उत्तर दिले.
धोनी म्हणाला, नक्कीच नाही. दरम्यान, धोनीच्या उत्तराने त्याचे चाहते नक्कीच सुखावले असतील.
चेन्नईने १३व्या हंगामात सर्वांना निराश केले. पहिला सामना जिंकल्यानंतर चेन्नईची एक्सप्रेस गाडी रुळावरून घसरली, ती प्ले ऑफच्या शर्यतीतून बादच झाली. पण, मागील दोन सामन्यांत विजय मिळवून चेन्नईच्या खेळाडूंनी त्यांच्यातला स्पार्क दाखवला आहे. पण ते स्पर्धेतून बाहेर गेले आहेत. या नामुष्कीनंतर आयपीएल २०२१ साठी संघात बरेच बदल केले जातील, याचे संकेत फ्रँचायझीने दिले आहेत.
आयपीएलच्या तेराव्या हंगामातील ५३वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये खेळला जात आहे. पंजाबसाठी हा सामना 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. तर चेन्नईचा संघ या सामन्यात प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार आहे.
चेन्नईने या सामन्यासाठी आपल्या संघात तीन बदल केले आहेत. त्यांनी शेन वॉटसन, मिचेल सँटनर आणि कर्ण शर्माला संघाबाहेर ठेवले आहे. तर त्यांच्या जागेवर फाफ डु प्लेसिस, इम्रान ताहीर आणि शार्दुल ठाकूरला अंतिम संघात संधी दिली आहे. दुसरीकडे पंजाबने देखील दोन बदल केले आहेत. यात त्यांनी ग्लेन मॅक्सवेल आणि अर्शदीप सिंगला यांना वगळून त्यांच्या जागेवर जेम्स निशन आणि मयांक अग्रवालला घेतले आहे.
हेही वाचा - IPL २०२० Points Table : हैदराबादची सातव्या स्थानावरून मोठी झेप, इतरांची धाकधुक वाढवली
हेही वाचा - Live CSK vs KXIP : पंजाबच्या डावाला सुरूवात, राहुल-मयांक जोडी मैदानात