मुंबई - कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. शनिवारी आबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात केकेआरने सनरायझर्स हैदाराबादचा ७ गडी राखून पराभव केला. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर केकेआरने आपली कामगिरी उंचावत हा विजय साकारला. केकेआरच्या विजयात या पाच खेळाडूंनी महत्वाची भूमिका निभावली. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
शुबमन गिल -
केकेआरचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने ६२ चेंडूत नाबाद ७० धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यात ५ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. गिलने इयॉन मॉर्गन सोबत चौथ्या गड्यासाठी नाबाद ९२ धावांची भागिदारी केली.
इयॉन मॉर्गन -
केकेआरचे तीन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर शुबमन गिलला इयॉन मॉर्गनने चांगली साथ दिली. दोघांनी नाबाद ९२ धावांची भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला. यात मॉर्गनने २९ चेंडूत नाबाद ४२ धावा केल्या. यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.
नितिश राणा -
केकेआरचा डावखुरा फलंदाज नितिश राणाने १३ चेंडूत २०० च्या स्ट्राईक रेटने २६ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार लगावले.
पॅट कमिन्स -
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात महागडा ठरलेला पॅट कमिन्सने, सनरॉयझर्स विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने चार षटकात १९ धावा देत एक गडी बाद केला. हैदराबादचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोला त्याने माघारी धाडले.
वरुण चक्रवर्ती -
कोलकाताकडून पहिलाच सामना खेळत असलेल्या वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी नोंदवली. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर हैदराबादच्या फलंदाजांना वेसन घातली. चार षटकात २५ धावा देत त्याने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला बाद केले.