दुबई - आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरूवात होण्यासाठी तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. स्पर्धेसाठी सर्व संघ कसून सराव करत आहेत. यादरम्यान, दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने, एक निर्धार बोलून दाखवला आहे. त्याने यंदाच्या हंगामात एकही सामना न गमावण्याचा निर्धार केला आहे.
आयपीएलच्या मागील हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली संघाने चांगली कामगिरी केली होती. दिल्लीचा संघ गुणातालिकेत तिसऱ्या क्रमाकांवर राहिला. त्यामुळे यंदा या संघाकडून अनेकांना चांगल्या अपेक्षा आहेत. २० सप्टेंबरला दिल्लीचा संघ पंजाबविरुद्ध या हंगामातला पहिला सामना खेळेल. हंगामाला सुरुवात होण्याआधीच संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने यंदाच्या हंगामात एकही सामना न गमावण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.
एका क्रीडा माध्यमाशी बोलताना अय्यर म्हणाला, आम्हाला यंदाच्या हंगामात एकही सामना गमवायचा नाही, यासाठी आम्हाला चांगली कामगिरी करवी लागेल. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकही सामना न गमावता विजेतेपद मिळवण्याची किमया कोणत्याही संघाला साधता आलेली नाही. राजस्थान रॉयल्स संघाने २००८ साली ३ पराभवासह विजेतेपद पटकावलं होते. त्यामुळे आतापर्यंत कोणालाही न जमलेली कामगिरी करुन दाखवण्याचा निर्धार अय्यरचा आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा हंगाम यूएईमध्ये खेळवला जात आहे. या हंगामात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - 'या' दिग्गज क्रिकेटपटूंची २०२०ची आयपीएल असणार अखेरची?
हेही वाचा - टीम इंडियात खेळलेल्या कोल्हापूरच्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन, BCCI ने वाहिली श्रद्धाजंली