नवी दिल्ली - जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसचा परिणाम क्री़डाक्षेत्रावरही झाला आहे. पुरूषांच्या क्रिकेट मालिकेची सुरूवात झाली असली, तर, महिला क्रिकेटचे पुनरागमन बाकी आहे. यासह, टी-20 वर्ल्ड कप, एशिया कपवरही कोरोनाचे काळे ढग अजूनही फिरत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार भारतीय महिला संघाचा इंग्लंड दौरादेखील रद्द करण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या दौर्यावर भारत तिरंगी मालिका खेळणार होता. परंतु भारतीय संघाने या मालिकेतून माघार घेतली आहे. भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ही मालिका रंगणार होती.
"दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. म्हणूनच आमच्याकडे मालिका सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आम्ही गेल्या आठवड्यात इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला आमच्या यूकेमध्ये येण्यास असमर्थता दर्शवली. भारत व लंडनला विमानसेवा कधी सुरू होईल, हेही अस्पष्ट आहे", असे एका सूत्राने सांगितले आहे.
चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 18 हजार 800 कोरोना रुग्ण आढळले असून 4 हजार 388 जणांचा मृत्यू झाला आहे.