गयाना - अतिशय रोमांचकारी झालेल्या विंडीजविरूद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने अवघ्या ५ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे ९ षटकांच्या झालेल्या या सामन्यात भारताने ७ गडी गमावत ५० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात खेळताना विंडीजचा संघ ४५ धावाच करू शकला.
हेही वाचा - फेडररला हरवणाऱ्या २१ वर्षाच्या सितसिपासने जिंकली एटीपी फायनल्स स्पर्धा
या विजयामुळे टीम इंडियाने विंडीजविरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० ने आघाडी घेतली आहे. विंडीजच्या संघाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. पूजा वस्त्राकरने भारताकडून सर्वाधिक १० धावा केल्या. शेफाली वर्माने ७, जेम्मीया रॉड्रिग्जने ६, वेदा कृष्णमूर्तीने ५, कर्णधार हरमनप्रीत कौरने ६, तानिया भाटियाने ८ धावांचे योगदान दिले. विंडीजकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ बळी घेतले.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना, विंडीजचा संघ ५ गड्यांच्या मोबदल्यात ४५ धावाच करू शकला. विंडीजकडून हेली मॅथ्यूज आणि चिनले हेन्रीने प्रत्येकी ११ धावांचे तर, नताशा मॅक्लीनने १० धावांचे योगदान दिले. भारताकडून अनुजा पाटीलने दोन बळी घेतले आहेत.