बंगळुरू - ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बंगळुरूच्या चिन्नास्वाामी स्टेडियमवर सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, भारताचे माजी क्रिकेटपटू रमेशचंद्र ऊर्फ बापू नाडकर्णी यांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले आहेत.
शुक्रवारी (ता. १७) माजी क्रिकेटपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झालं. ते मृत्यूसमयी ८६ वर्षांचे होते. पत्नी व दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. बापू यांनी खास गोलंदाजीच्या शैलीमुळे क्रिकेटविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण झाली होती. बापूंच्या सन्मानासाठी आज भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी काळी पट्टी बांधली आहे. सामन्यांच्या आधी बीसीसीआयने यासंदर्भातील घोषणा केली होती.
नाशिक जिल्ह्यात ४ एप्रिल १९३३ मध्ये बापू यांचा जन्म झाला. रमेश गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव असून क्रिकेटविश्वात त्यांना बापू नाडकर्णी या नावाने ओळखले जायचे.
प्रथम श्रेणी आणि कसोटी सामन्यातील बापूंची गोलंदाजीची आकडेवारी पाहिल्यावर, ते सगळ्यात कंजूष गोलंदाज होते, हे दिसून येते. १९६४ साली १२ जानेवारीला खेळवण्यात आलेल्या कसोटीत एका डावात त्यांनी सलग २१ षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रम केला होता.
हेही वाचा - NZ A vs Ind A : मुंबईकर पृथ्वी शॉची कमाल, न्यूझीलंडच्या संघाला झोडपलं.. पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IndvAus : अनहोनी को होनी कर दे... कुलदीपने शेअर केला भारताच्या अमर अकबर अँथनीचा फोटो