नवी दिल्ली - कोरोनानंतर क्रिकेटचे पुनरागमन झाल्यावर खेळाडूंना नवीन नियम अवलंबण्यास तयार राहावे लागेल, असे मत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने दिले आहे. संक्रमणाची शक्यता लक्षात घेता, कसोटी क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूला चमक देण्यासाठी लाळेच्या जागी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्यास मान्यता मिळू शकते.
आयपीएलमधील फ्रेंचायझी दिल्ली कॅपिटल्सच्या इन्स्टाग्रामवर इशांत म्हणाला, ''आपल्याला माहित आहे की क्रिकेटमध्ये काही बदलांविषयी चर्चा आहेत. लाळेचा वापर थांबवला तर आपण आपल्या इच्छेनुसार चेंडू चमकवू शकणार नाही. परंतु पर्याय नाही. तुम्हाला याची सवय लावावी लागेल. पण खरे सांगायचे तर मी या सर्व गोष्टींबद्दल जास्त विचार करत नाही. मला वाटते की दूरचा विचार करण्यापेक्षा सध्याचे जगणे आवश्यक आहे."
लॉकडाऊन सुरू झाल्यावर अस्वस्थ असल्याचे इशांतने कबुल केले आहे. यासाठी त्याने वेळापत्रकही बदलले. तो म्हणाला, "मी सकाळी पाच वाजता उठतो आणि कसरत करतो. जर तुम्हाला वरच्या स्तरावर खेळायचे असेल तर शिस्त पाळणे अधिक महत्वाचे आहे असे मला वाटते."
दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगचे इशांतने आपला सर्वोत्तम प्रशिक्षक म्हणून वर्णन केले आहे. इशांत म्हणाला, ''मी भेट दिलेल्या सर्व प्रशिक्षकांपैकी पाँटिंग सर्वोत्तम आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये परत आल्यावर मी घाबरून गेलो होतो. मला असे वाटत होते की मी पहिल्यांदा खेळणार आहे. पण पहिल्या दिवसापासूनच पाँटिंगने मला खूप आत्मविश्वास दिला.''