मुंबई - आजच्या दिवशीच १९८३ ला भारतीय क्रिकेट संघाने त्यावेळच्या दिग्गज वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराभव करत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. या विजयाने जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख मिळवून दिली. आज पहिला विश्वविजेता भारतीय संघ अनेक लोकांना आठवतही नसेल. चला तर मग जाणून घेऊयात भारताच्या जगज्जेत्या बनण्याच्या प्रवासाबद्दल.
१९७५ ला चालू झालेली क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धा आतापर्यंत ११ वेळा खेळली गेली आहे. यातील पहिल्या २ विश्वकरंडक स्पर्धा या वेस्ट इंडीजने जिंकल्या होत्या. या दोन्ही स्पर्धा भारतासाठी चांगल्या गेल्या नसल्याने भारताकडे एक कमकुवत संघ म्हणून पाहिले जात होते.
दुबळा भारतीय संघ आणि तिसरी विश्वकरंडक स्पर्धा
१९८३ ला ९ मे ते २५ जूनपर्यंत इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेली विश्वकरंडक स्पर्धा भारतासाठी खूप खास ठरली होती. कारण याच स्पर्धेत भारताने पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान मिळवला होता. या स्पर्धेत अ गटात इंग्लंड, पाकिस्तान, न्युझीलंड आणि श्रीलंका हे संघ होते. तर ब गटामध्ये वेस्ट इंडीज, भारत, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे यांचा समावेश होता. या काळात भारत आणि झिम्बाब्वेच्या संघाला अंडरडॉग्सपेक्षाही कमी महत्व दिले जायचे. मात्र, भारताने या स्पर्धेत अविश्वसनीय कामगिरी करत सुरुवातीच्या सामन्यांमध्ये वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघावर सलग विजय मिळवला होता. १९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले होते व सर्व सामने हे ६० षटकांचे खेळवण्यात आले होते. या विश्वकरंडक स्पर्धेला प्रुडेंशियल चषक स्पर्धा' असेही ओळखले जायचे.
अंतिम सामना
१९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच विजेतेपदासाठी वेस्टइंडीज आणि भारत आमने सामने होते. एकीकडे २ वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडीजचा संघ तर दुसरीकडे तुलनेत सर्वच क्षेत्रात दुबळा असलेला भारतीय संघ. अंतिम सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ १४० धावांवर गारद झाल्याने भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिला-वहिला जागतिक क्रिकेट विश्वकरंडक आपल्या नावावर केला.
अंतिम सामन्यात मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांची शानदार गोलंदाजी
अंतिम सामन्यात वेस्टइंडीजचे कर्णधार क्लाईव्ह लॉईड यांनी विजयोत्सवाची तयारी केली होती. मात्र, भारताच्या मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. मोहिंदर आणि मदन यांनी अंतिम लढतीत प्रत्येकी ३ बळी घेत भारताच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. वेस्ट इंडीज संघाकडून सर व्हिविअन रिचर्ड्स यांनी सर्वाधिक ३३ धावा केल्या. मोहिंदर अमरनाथ यांना अंतिम आणि उपांत्य सामन्यात सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.
वेस्ट इंडिजचा फाजील आत्मविश्वास
१९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत वेस्ट इंडीजला त्यांच्या फाजील आत्मविश्वासामुळे धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. क्लाईव्ह लॉईड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडीजचा संघ अंतिम सामन्यात दुबळा भारत आल्याने खूप खुश होता. पूर्ण संघ तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याच्या तयारीत होता. मात्र अतिआत्मविश्वासाने वेस्ट इंडीज संघाचा घात केला.
कपिल देव यांची ऐतिहासिक दीडशतक
१९८३ साली झालेल्या विश्वकरंडकात झिम्बाब्वेविरुद्धच्या एका सामन्यात भारतीय कर्णधार कपिल देव १७५ धावांची दीडशतकी खेळी साकारली होती. त्यावेळी कपिल देव यांचे वय अवघे २४ वर्षे होते.
१९८३ च्या विश्वकरंडक स्पर्धेत सहभागी झालेला भारतीय संघ
- भारत - कपिल देव (कर्णधार), मोहिंदर अमरनाथ , किर्ती आझाद, रॉजर बिन्नी, सुनील गावसकर, सय्यद किरमाणी (यष्टीरक्षक), मदन लाल, संदीप पाटील, बलविंदर सिंग संधू, यशपाल शर्मा, रवी शास्त्री, कृष्णमाचारी श्रीकांत, सुनील वाल्सन आणि दिलीप विपन.