नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या मोसमाच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर सुरेश रैना पुन्हा मैदानात परतण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. आयपीएलचा 13 वा हंगाम युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे.
आयपीएल फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रैनाने सरावानंतर आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला, "आम्ही पुन्हा मैदानात खेळू शकतो, हे स्वप्न पाहण्यासारखे आहे."
रैना आणि यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत काही काळापासून एकत्र सराव करत आहेत. रैना लेगस्पिनर पीयूष चावला आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांच्याबरोबरही सराव करतानाही दिसला होता.
यंदाची आयपीएलची विंडो 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान युएई येथे निश्चित केली गेली असून सर्व फ्रेंचायझींना याची माहिती देण्यात आली असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले आहे.
यंदाचे आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा होती. मात्र, ही स्पर्धा या तारखेच्या आठवडाभरापूर्वी व्हावी, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, जेणेकरुन भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्यावर परिणाम होऊ नये.