तिरुवनंतपुरम - भारतीय संघाने दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडीज संघासमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष ठेवले आहे. तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात विडींज कर्णधार केरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर भारतीय संघाने निर्धारीत २० षटकात ७ बाद १७० धावा केल्या. शिवम दुबेने ३० चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५४ धावांची खेळी केली.
हेही वाचा - ब्रिस्बेन हिट ठरला बिग बॅश महिला लीगचा विजेता, सलग दुसऱ्यांदा पटकावलं जेतेपद
नाणेफेक जिंकून विंडीजने भारताला फलंदाजीचे निमंत्रण दिले. मागच्या सामन्यात चांगली कामगिरी करणार लोकेश राहुल ११ धावांवर बाद झाला. पीएरेने त्याला हेटमायरकरवी बाद केले. रोहित शर्मालाही आजच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. १८ चेंडूत १५ धावा करत रोहित माघारी परतला.
तिसऱ्या क्रमाकांवर बढती मिळालेल्या शिवम दुबेने संधीचा पुरेपुर फायदा उचलत विंडीजच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आहे. शिवमने २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि तो व्यक्तीगत ५४ धावांवर बाद झाला. तर ऋषभ पंतने मोक्याच्या क्षणी नाबाद ३३ धावा केल्याने भारतीय संघाला १७० धावापर्यंत मजल मारता आली.
या सामन्यासाठी भारताने आपला संघ कायम ठेवला असून विंडीजने दिनेश रामदिन ऐवजी निकोलस पूरनला संघात स्थान दिले आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.