विशाखापट्टणम - भारत आणि वेस्ट इंडीज संघात दुसरा एकदिवसीय सामना उद्या (बुधवार) रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला आणि १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघ दुसऱ्या सामन्यात बरोबरी साधण्यासाठी खेळ करेल, तर दुसरीकडे विंडीजचा संघ मालिका विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, या सामन्यात विराट कोहलीसह भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
भारताची सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. मात्र, दुसऱ्या सामन्यात संघाला चांगली सलामी मिळावी, यासाठी दोघांना चांगला खेळ करावा लागेल. तिसऱ्या क्रमाकांवर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी उतरेल. विराट पहिल्या सामन्यात अवघ्या ४ धावांवर बाद झाला. यामुळं दुसऱ्या सामन्यात त्यांची कामगिरी उंचावणं गरजेचं आहे.
विराटनंतर चौथ्या क्रमाकांवर श्रेयस अय्यर येईल. पहिल्या सामन्यात त्यानं ७० धावांची खेळी केली होती. दुसऱ्या सामन्यातही अशाच खेळीची अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. तर पहिल्या सामन्यात ७१ धावांची खेळी करणारा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला आपला दणकेबाज फॉर्म कायम राखावा लागणार आहे. शिवम दुबे आणि केदार जाधव आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू खेळाडूंची भूमिका पार पाडतील.
गोलंदाजीची मदार मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांच्यावर असणार आहे. तर त्यांना फिरकीपटू युजवेंद्र चहल, कुलदीप यादव यांची साथ असणार आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी अशी असू शकते टीम इंडिया -
रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर आणि मोहम्मद शमी.