मुंबई - सर्वच आघाड्यांवर दमदार कामगिरी करत भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धचा तिसरा आणि निर्णायक टी-२० सामना ६७ धावांनी जिंकला. रोहित शर्मा, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या दणकेबाज अर्धशतकांच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारीत २० षटकात ३ बाद २४० धावा चोपल्या. तर प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजच्या संघाला ८ बाद १७३ धावांपर्यंत मजल मारता आली. दरम्यान, भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ ने जिंकली. ९१ धावांची खेळी करणाऱ्या केएल राहुलला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
भारताच्या २४१ धावांच्या खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि केरॉन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. दुसरीकडे केरॉन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. मात्र, ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. भारताकडून भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, दीपक चहर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. कर्णधार पोलार्डचा हा निर्णय चुकला. सलामीवीर रोहित शर्मा-लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात धावांचा डोंगर उभा केला. भारताने निर्धारीत २० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात २४० धावा केल्या. भारताकडून लोकेश राहुलने ९१, रोहित शर्माने ७१ तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद ७० धावा केल्या. विंडीजकडून कोट्रेल, विल्यम्स आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात केली. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १३५ धावा जोडल्या. या दरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. रोहित शर्मा ७१ धावांवर माघारी परतल्यानंतर ऋषभ पंतला फलंदाजीत तिसऱ्या क्रमाकांवर बढती देण्यात आली. मात्र, पंत पोलार्डच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने नाबाद आक्रमक ७० धावा केल्या. तर राहुल ९१ धावांवर बाद झाला.