रांची - भारतीय संघाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेला 'व्हाईटवॉश' दिला. तिसऱ्या कसोटी सामन्यात फॉलोऑन लादल्यानंतर आफ्रिकेचा संघ १३३ धावांवर आटोपला. भारताने हा सामना एक डाव २०२ धावांनी जिंकला. तत्पूर्वी भारताने पहिल्या डावात ४९७ धावा केल्या होत्या. त्यानंतर आफ्रिकेला पहिल्या डावात १६२ तर फॉलो-ऑन देत दुसऱ्या डाव १३३ धावांमध्ये ऑलआउट करत मालिकेवर ३-० ने कब्जा केला.
तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या विजयाची औपचारिकता शिल्लक होती. कारण फॉलो-ऑन दिल्यानंतर तिसऱ्या दिवसा अखेर दुसऱ्या डावात आफ्रिकेची अवस्था ८ बाद १३२ अशी झाली. त्यामुळे आफ्रिकेचा पराभव जवळपास पक्का होता. शाहबाद नदीमने दोन चेंडूत दोन गडी बाद करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी रांचीच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करत पहिला डाव ९ बाद ४९७ धावांवर घोषित केला. रोहित शर्माचे (२१२) द्विशतक आणि अजिंक्य रहाणेचे (११५) शतक या खेळींच्या जोरावर भारताने आफ्रिकेसमोर धावांचे डोंगर उभारला. तिसर्या दिवशी आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपला. तिसर्या क्रमांकावर आलेल्या हामजाने ६२ तर टेंबा बावुमाने ३२ धावा केल्या. या डावात, भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन तर, मोहम्मद शमी, शाहबाझ नदीम आणि रविंद्र जडेजा यांना दोन बळी बाद केले.
आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर आटोपल्यानंतर कर्णधार कोहलीने फॉलो-ऑन दिला. दुसऱ्या डावातही भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेने गुडघे टेकले. सलामीवीर आणि मधली फळी सपशेल अपशयी ठरल्यामुळे भारत आफ्रिकेला शंभर धावांच्या आतच गुंडाळणार असे वाटत होते. मात्र, पाहुण्यांच्या शेवटच्या फलंदाजांनी थोडा प्रतिकार केला. लिंडेच्या २७ आणि पीड्तच्या २३ धावांमुळे पाहुण्यांना शंभरचा टप्पा ओलांडता आला.
तिसऱ्या दिवसाअखेर आफ्रिकेने ८ बाद १३२ धावा केल्या होत्या. खेळ थांबला तेव्हा आफ्रिकेकडून थेऊनिस ब्रायन ३० आणि नॉर्टजे ५ धावांवर तग धरून होते. मात्र आज चौथ्या दिवशी सकाळी फिरकीपटू शाहबाज नदीमने दोन चेंडूत दोन गडी बाद करत विजयावर शिकामोर्तब केले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन, उमेश यादव आणि शाहबाज नदीमने प्रत्येकी दोन तर, रविंद्र जडेजा आणि अश्विनने एक गडी बाद केला. दरम्यान, या मालिकेत धावांचा पाऊस पाडणाऱ्या रोहित शर्माला 'सामनावीर' आणि 'मालिकावीरा'चा पुरस्कार देण्यात आला.