पोचेफस्ट्रम (दक्षिण आफ्रिका) - १९ वर्षाखालील आयसीसी विश्व करंडक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत गाठली. पाकिस्तानचे १७३ धावांचे माफक आव्हान भारतीय संघाने १० गडी राखून पूर्ण केले. भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने नाबाद शतकी खेळी केली. त्याला दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावा काढत साथ दिली.
यशस्वी जैस्वालने ११३ चेंडूत नाबाद १०५ धावांची खेळी साकारली. त्याच्या या खेळीत ८ चौकार आणि ४ षटकाराचा समावेश आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. १७३ धावांचा पाठलाग करताना, भारतीय सलामीवीरांनी सुरूवातीला जम बसवला. त्यानंतर त्यांनी फटकेबाजी केली. जैस्वालने पाकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली.
आयसीसी १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार रोहिल नाझीरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्याचा हा निर्णय पुरता फसला. भारतीय माऱ्यासमोर पाकचा संघ १७२ धावांत आटोपला. सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांचा अपवाद वगळता पाकच्या सर्व फलंदाजांनी निराशा केली.
पाकची सुरूवात खराब झाली. फॉर्मात असलेला मोहम्मद हुराइरा अवघ्या ४ धावांवर बाद झाला. त्याला सुशांत मिश्राने सक्सेनाकरवी झेलबाद करत भारताला पहिला यश मिळवून दिले. यानंतर रवी बिश्नोईने फआद मुनीरला शून्यावर बाद करत पाकला दुसरा धक्का दिला.
तेव्हा सलामीवीर हैदर अली आणि कर्णधार रोहिल नाझीर यांनी पाकचा डाव सावरला. हैदरने यादरम्यान आपले अर्धशतकही पूर्ण केले. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरणार असे वाटत असताना, यशस्वी जैस्वालने अलीला माघारी धाडले. त्याने ५६ धावा केल्या.
अली बाद झाल्यानंतर पाकचा डाव गडगडला. तेव्हा कर्णधार रोहिल नाझीर एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने अर्धशतक झळकावले. तो सुशांतच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माघारी परतला. त्याने ६२ धावांची खेळी केली. भारताकडून सुशांत मिश्राने सर्वाधिक ३ गडी बाद केले. कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी २-२ तर अथर्व अंकोलेकर आणि यशस्वी जैस्वाल यांनी प्रत्येकी १-१ बळी टिपला.