अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला सुरूवात होण्याआधीच पाहुण्या संघाला एक जबर धक्का बसला आहे. इंग्लंडचा एक स्टार खेळाडू क्रिकेट बोर्डाच्या नियमामुळे मालिकेतून माघार घेऊन मायदेशी परतला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सध्या सर्व खेळाडूंसाठी रोटेशन पॉलिसी राबवली असून या पॉलिसीनुसार, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स याने चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. वोक्स दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि भारत या तिन्ही दौऱ्यांसाठी इंग्लंडच्या चमूमध्ये होता. पण त्याला तिन्ही दौऱ्यात अंतिम ११मध्ये संधी मिळाली नाही. अखेर गुरूवारी वोक्स मायदेशी परतला.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात चार सामन्याची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना इंग्लंड संघाने जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. तेव्हा भारतीय संघाने पुढील दोन सामने जिंकत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत इंग्लंडच्या संघाला विजय मिळवणे अनिवार्य आहे.
दुसरीकडे भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला पात्र ठरण्यासाठी इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी अनिर्णीत किंवा जिंकावी लागेल. अखेरच्या कसोटीत दमदार कामगिरी करण्याच्या दृष्टीने दोन्ही संघाचे खेळाडू जोरदार तयारी करत आहेत.
हेही वाचा - तब्बल ९ वर्षानंतर तेजतर्रार गोलंदाजाचे विंडीज संघात पुनरागमन
हेही वाचा - IND vs ENG: बुमराहची चौथ्या कसोटीतून माघार, जाणून घ्या कारण