गुवाहाटी - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पावसामुळे खेळपट्टी खराब झाल्याने रद्द करावा लागला. ६ वाजून ३० मिनिटांनी नाणेफेक झाल्यानंतर पावसाने हजेरी लावली. पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टीची तीन वेळा पाहणी करण्यात आली. शेवटची पाहणी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली आणि त्यानंतर पुढील २४ मिनिटानंतर सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. दरम्यान, सामना सुरू होईल या आशेने चाहते भर पावसातही स्टेडियममध्ये ठाण मांडून होते. मात्र, क्रिकेटपटूंनी ९ वाजताच स्टेडियम सोडून हॉटेल गाठल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिन देवाजित सैकिया यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितले की, 'चेत्तीथोडी शमशुद्दीन, नितीन मेनन, अनिल चौधरी आणि मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी ९ वाजून ३० मिनिटांनी खेळपट्टीची पाहणी केली. मात्र, तो पर्यंत बहुतांश खेळाडूंनी स्टेडियम सोडून हॉटेल गाठलं होते. चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागू नये म्हणून पाहणी करण्याची रणनीती आखली गेली. हा शिष्टाचार पाळावा लागतो. मी तुम्हाला कटू सत्य सांगितलं आहे.'
ग्राऊंड्समनला ९ वाजण्याच्या आत खेळपट्टी तयार करा, अन्यथा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशा सुचना सामनाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यांनी फक्त ग्राऊंड्समनला फक्त ५७ मिनिटाचा वेळ दिला होता. जर आम्हाला अधिक वेळ मिळाला असता, तर आम्ही खेळपट्टी सुकवण्यात यशस्वी ठरलो असतो, असेही सैकिया यांनी सांगितले.
दरम्यान, खेळाडूंनी ९ वाजताच मैदान का सोडले याचे उत्तर अद्याप बीसीसीआयकडून देण्यात आलेले नाही. उभय संघात दुसरा टी-२० सामना इंदूरच्या मैदानावर मंगळवारी (ता. ८) खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - कपिल देव यांच्या वाढदिवशी रणवीर सिंगने शेअर केले खास फोटो
हेही वाचा - सहावा षटकार ठोकण्यापूर्वी कार्टर काय विचार करत होता?