मोहाली - भारतीय संघाने वेस्ट इंडीजसह अनेक देशांमध्ये मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मात्र, टी-२० प्रकारात भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवता आलेला नाही. सध्या भारत विरुध्द दक्षिण आफ्रिका संघामध्ये ३ टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना धर्मशाला येथे होणार होता. मात्र, मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आता भारतीय संघ आफ्रिका संघाविरोधात १८ सप्टेंबरला मोहालीच्या मैदानात दोन हात करणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाचा रेकार्ड वाचा...
हेही वाचा - IND VS SA : भारतीय क्रिकेट संघाची सुरक्षा रामभरोसे, कारण..
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आतापर्यंत एकूण १५ टी-२० सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने ८ सामन्यात विजय मिळवला आहे. तर आफ्रिका संघाने ५ सामने जिंकले आहेत. राहिलेले २ सामने होऊ शकले नाही. भारताने जरी ८ सामन्यात विजय मिळवला असला तरी, भारतीय संघ आपल्या होम मैदानात कधीही आफ्रिकेला पराभूत करु शकलेला नाही.
दोन्ही उभय संघामध्ये भारतात एकूण ४ सामने झाले आहेत. यातील दोन सामन्यात आफ्रिकेचा संघ भारतावर वरचढ ठरला आहे. तर राहिलेले दोन सामने रद्द करण्यात आले आहेत. रद्द झालेल्या सामने कोलकाता आणि धर्मशाला मैदानात खेळवण्यात येणार होते.
हेही वाचा - यंदाच्या अॅशेस मालिकेतील स्मिथचे हे विक्रम पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
सध्या भारत विरुध्द आफ्रिका संघामध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेत एकही चेंडूचा खेळ अद्याप होऊ शकलेला नाही. पहिला सामना पावसामुळे रद्द ठरला. आता दुसरा सामना १८ सप्टेंबरला (बुधवार) मोहालीच्या मैदानावर होणार आहे. दरम्यान, या मालिकेत युवा खेळाडूंच्या प्रदर्शनावर निवड समितीचे लक्ष असणार आहे.