धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्याच्या मालिकेला उद्या (ता. १२ ) पासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. पण, या सामन्याला कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
धर्मशाळा स्टेडियमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे प्रेक्षकांनी या सामन्याला पाठ फिरवली आहे. मैदानातील कॉर्पोरेट बॉक्स देखील रिकामे आहेत. मैदानात १२ कॉर्पोरेट बॉक्स आहेत. यापैकी ९ कॉर्पोरेट बॉक्स रिकामे आहेत.'
दरम्यान, एका बॉक्समध्ये १२ जण बसू शकतात. या बॉक्सच्या तिकिटाची किंमत २ लाख इतकी आहे. धर्मशाळा स्टेडियममध्ये २२ हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात. पण पहिल्या सामन्याची ४० टक्के तिकिटांची विक्री देखील झालेली नाही, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, दक्षिण आफ्रिका संघाने कोरोनाच्या धोक्यामुळे भारतीय खेळाडूशी हस्तांदोलन टाळणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धर्मशाळा येथील मैदानावरही कोरोना पासून वाचण्यासाठी काय करावे, यासाठीचे मार्गदर्शन करणारे फलक लावण्यात आले आहेत.
चीनपासून सुरूवात झालेल्या कोरोना व्हायरसचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना दिसून येत आहे. आजघडीपर्यंत या व्हायरसने जगभरात ४ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १०० हून अधिक देशांमध्ये या व्हायरसचा फैलाव झाला आहे. भारतामध्येही ६० हून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.
हेही वाचा - IPL २०२० स्पर्धा रद्द करा, उच्च न्यायालयात याचिका
हेही वाचा - ODI World Cup २०२१ च्या तारखा जाहीर, टीम इंडियाला...