नवी दिल्ली - भारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याला सुरूवात होण्याआधीच जबर धक्का बसला आहे. सलामीवीर शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्ध २४ तारखेपासून सुरू होणार्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नसल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धवनने चांगली कामगिरी केली. परंतु दुखापतीचा फटका त्याला बसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यादरम्यान, त्याची दुखापत पुन्हा उफाळून आली. यामुळे त्याच्या ठिकाणी युझवेंद्र चहल क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला. दरम्यान, धवनच्या खांद्याचा एक्सरे काढण्यात आला असून यात त्याला दुखापत झाल्याचे समजते.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, धवन न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार नाही. धवन न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडल्यास, त्याच्या जागी पृथ्वी शॉची संघात वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. शॉ शिवाय, शुभमन गिल आणि मयांक अगरवाल यांचेही नाव आघाडीवर आहे.
दरम्यान, भारताचे काही खेळाडू न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना झाले आहे. याचा एक फोटो जसप्रीत बुमराहने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत धवन नाही. न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा याआधी करण्यात आली आहे. एकदिवसीय आणि कसोटी संघासाठी आज घोषणा होण्याची शक्यता आहे.
असा आहे भारताचा टी-२० संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा व शार्दुल ठाकूर.
हेही वाचा - न्यूझीलंड दौर्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, इशांत शर्मा जखमी
हेही वाचा - १५ ते २० दिवसांसाठी द्रविड घेणार पांड्याचा क्लास!