मेलबर्न - आयसीसी महिला टी-२० विश्वकरंडकाच्या विजेतेपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत होत आहे. या सामन्याआधी, भारतीय महिला संघाची अष्टपैलू फलंदाज वेदा कृष्णमूर्तीने अंतिम सामन्यात नशिबाची साथ भारताच्याच बाजूने असेल, अशी आश्वासक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अंतिम सामन्याआधी बोलताना वेदा म्हणाली, 'यंदाच्या विश्वकरंडकात नशीबाची साथ भारताच्या बाजूने आहे. अनेक गोष्टी भारताच्या जमेच्या बाजू ठरत आहेत. यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या (रविवार) होणाऱ्या अंतिम सामन्यात आलेल्या दडपणाचा यशस्वी सामना केल्यास आम्ही पहिला टी-२० विश्वकरंडक जिंकू शकतो.'
याआधी कर्णधार हरमनप्रीत हिने, उपांत्य फेरीत असा पेचप्रसंग निर्माण होईल, याची आम्हाला आधीपासून कल्पना होती. यामुळे आम्ही साखळी फेरीतील सर्व सामने जिंकण्याचा निर्धार केला होता. त्यात आम्ही यशस्वी ठरलो. याचे सर्व श्रेय संघातील खेळाडूंना जाते. आता अंतिम फेरीत प्रवेश निश्चित झाल्याने संघातील सकारात्मता आणखी वाढली असल्याचे सांगितलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या (ता. ८ मार्च) मेलबर्न क्रिकेट मैदानावर अंतिम सामना होत आहे. भारत संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत प्रथमच अंतिम फेरीत दाखल झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे.
दरम्यान, भारतीय संघाने विश्वकरंडकाच्या पहिल्या सामन्यात गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर १७ धावांनी विजय मिळवला होता. यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्याती विजयी लय कायम राखणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - अंतिम फेरीत पोहोचल्यानंतरही कर्णधार हरमनप्रीत नाखूश , म्हणाली...
हेही वाचा - नाट्यसंमेलनासाठी १० कोटी मात्र, मैदानी खेळांसाठी तुटपुंजा निधी