मुंबई - महेंद्रसिंग धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारताने २००७ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशकडून लाजीरवाणा पराभव स्विकारला आणि देशात संतापाची लाट उसळली. सचिन, द्रविड, गांगुली यांच्यासारखे मातब्बर खेळाडू संघात असताना हा पराभव सर्वांच्याच जिव्हारी लागला होता. या पराभवानंतर याच वर्षी टी-२० च्या पहिल्यावहिल्या विश्वचषकासाठी नव्या दमाच्या टीम इंडियाची निवड झाली. त्याचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीच्या हातात दिले गेले.
संघातील नवखे खेळाडू आणि त्यांचा शिलेदार पाहून कोणीही या भारतीय संघाला विजयाचा दावेदार मानते नव्हते. पण या नव्या छाव्यांनी जो कारनामा स्पर्धेत करून दाखवला तो आत्तापर्यंत अबाधित राहिला आहे. आजपासून ठिक १२ वर्षांपूर्वी, २४ सप्टेंबर २००७ रोजी धोनीच्या टीम इंडियाने तो विश्वचषक तर जिंकलाच. पण, त्यासोबतच लोकांचा विश्वासही संपादन केला.
'ती' सुपरओव्हर -
या स्पर्धेत चित्तथरारक सामने पाहायला मिळाले होते. पाकिस्तानसोबत रंगलेला पहिला सामना सुपरओव्हरपर्यंत गेला होता. या सामन्याचे समीक्षण जेव्हा करण्यात आले तेव्हाच धोनीच्या क्रिकेटविषयीची अफाट बुद्धिमत्ता लोकांच्या नजरेत आली होती. सुपरओव्हरदरम्यान त्याने नियमित गोलंदाजापेक्षा इतर कामचलाऊ गोलंदाजांना स्थान दिले होते. आणि त्या सर्वच खेळाडूंनी कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला होता.
'ते'सहा षटकार -
टी-२० क्रिकेट किती वेगात खेळायचे असते याचा परिपाठ युवराज सिंगच्या त्या ६ षटकारांनी घालून दिला. फ्लिंटॉफने युवीला दिलेला राग आणि ब्रॉडने खाल्लेले ते षटकार आज १२ वर्षांनीही आपल्याला सारखे सारखे पाहावेसे वाटतात. तेव्हाच्या काळातील 'दादा' संघाला म्हणजेच ऑस्ट्रेलियाला याच युवराजने 'सळो की पळो' करून सोडले होते. युवीने ३० चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७० धावा करत बलाढ्य ऑस्ट्रलियाला नमवले होते. शिवाय, अंडरडॉग मानल्या गेलेल्या भारताने दिमाखात अंतिम फेरी गाठली होती.
'ती' विजयादशमी -
भारत आणि पाकिस्तान सामना म्हणजे चाहत्यांना एक विशेष भेटच असते. अश्यात हा सामना जर फायनलचा असेल तर, त्याला विशेष महत्व असते. अशाच प्रकारे २००७ च्या या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले. प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या. आर. पी. सिंग, इरफान पठाण या डावखुऱ्या गोलंदाजांनी पाकिस्तानला चांगलेच घाबरवले होते. या दोघांमुळे पाकची अवस्था ७७ धावांत ६ बाद अशी झाली होती. पण, त्यानंतर मिसबाह उल हकने भारतीय गोलंदाजांची समाचार घ्यायला सुरुवात केली. सामना इतका जवळ येऊन ठेपेल, असे कोणाला वाटले नव्हते. शेवटच्या षटकात भारताला एका विकेटची आणि पाकिस्तानला १३ धावांची गरज होती. मिसबाहचा तो रौद्रवतार पाहून हा सामना पाक जिंकणार हे निश्चित झाले होते. पण, धोनीने चेंडू जोगिंदर सिंगच्या हातात सोपवला आणि त्याचे हे षटक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले.