दुबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रिकेटपटूंसाठी एक नवा पुरस्कार सुरू केला आहे. यंदाच्या वर्षात जानेवारीपासून दर महिन्याला हा पुरस्कार देण्यात येईल. 'आयसीसीचा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू', असे या पुरस्काराचे नाव असणार आहे. पुरुष व महिला अशा दोन्ही वर्गवारीत हा पुरस्कार देण्यात येईल.
जानेवारी महिन्यात झालेल्या क्रिकेट मालिकांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघातील काही खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जो रूट हे खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. या पुरस्कारासाठी चाहत्यांनाही नामांकन मिळणाऱ्या खेळाडूंना मत देता येणार आहे.
हेही वाचा - BREAKING..! सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल
ऑनलाइन मतांव्यतिरिक्त स्वतंत्र आयसीसी मतदान अकादमीही तयार करण्यात आली आहे. यात माजी खेळाडू, प्रसारक आणि पत्रकारांचा समावेश असेल. आयसीसीच्या पुरस्कार नामांकन समितीद्वारे प्रत्येक प्रवर्गासाठी तीन अर्ज निश्चित केले जातील. मतदान अकादमी ईमेलद्वारे मतदान करेल, जे एकूण मतांच्या ९० टक्के असेल. महिन्याच्या पहिल्या दिवशी, आयसीसीकडे नोंदणीकृत चाहते आयसीसीच्या संकेतस्थळावर आपले मत नोंदवू शकतील, जे एकूण मतदानाच्या दहा टक्के असेल. महिन्याच्या दुसर्या सोमवारी विजेत्याची घोषणा केली जाईल.
आर. अश्विन आणि रिषभ पंत यांच्याखेरीज भारताचे मोहम्मद सिराज, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर हे भारतीय खेळाडूही या पुरस्काराच्या शर्यतीत आहेत. ऑस्ट्रेलियामधील कसोटी मालिकेतील ऐतिहासिक विजयात या सर्वांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.