दुबई - आयसीसीला आयपीएलच्या आयोजनात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नाही, असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी स्पष्ट केले आहे.
भारतीय माध्यमांत आयसीसी आयपीएलवर नियंत्रण ठेवण्याच्या तयारीत आहे, किंवा आयपीएलला चालवणार आहे, अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. याबाबत विचारले असताना रिचर्डसन म्हणाले, आम्ही भाग्यशाली आहोत, की जगभरात काही शानदार टी-ट्वेन्टी लीगचे आयोजन होत आहे. आयपीएल यापैकी एक आहे. आयपीएलने एक विशिष्ट पातळी स्थापन केली आहे. आम्ही आयपीएलच्या या रचनेचा वापर जगभरातील इतर टी-ट्वेन्टी लीगमध्ये वापर करुन त्यांच्या विस्तार वाढवू इच्छित आहोत.
डेव्ह रिचर्डसन म्हणाले, आयपीएल व्यतिरिक्त इतर देशात होणाऱ्या टी-ट्वेन्टी लीगही व्यवस्थित रचनेनुसार आयोजित करण्यात याव्यात. आयपीएलमध्ये हस्तक्षेप करण्याचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्याचा आयसीसीचा कोणताही उद्देश नाही. जगभरात क्रिकेट लोकप्रिय व्हावे, असे आयसीसीला वाटते.