दुबई - कसोटी क्रिकेटमधील प्रेक्षकांची रुची कमी झालेली नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधील त्यांची रुची कायम ठेवण्यासठी ५ दिवसांच्या सामन्यांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे डेव्ह रिचर्डसन यांनी म्हटले आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (आयसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
काही दिवसांपूर्वी आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी म्हटले होते, की कसोटी क्रिकेट हळू-हळू संपत चालले आहे. शशांक मनोहर यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचर्डसन म्हणाले, कसोटी क्रिकेटमध्ये अधिक प्रासंगिकता आणण्याची गरज आहे, असे मनोहर यांचे म्हणणे होते. कसोटी क्रिकेटमध्ये अटीतटीचे सामने होत आहेत. परंतु, तुम्ही प्रतिनिधित्व करत असलेल्या संघांचे चाहते नसाल, तर कसोटी सामना किंवा मालिकेबद्दल चाहत्यांत उत्सुकता दिसून येत नाही.
कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा
डेव रिचर्डसन म्हणाले, जागतिक स्तरावर कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू झाल्यानंतर कसोटीतील रुची वाढेल. यामध्ये कोणतेही संघ सहभागी असोत. चाहते याला निश्चितच पसंत करतील. कसोटी क्रिकेटला अतिरिक्त प्रोत्साहन देण्यासाठी कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा अत्यंत उपयोगी ठरेल.