नागपूर - सध्या जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याचा फटका आता इंडियन प्रीमिअर लीगलाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे यंदाची आयपीएल पुढे ढकलली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलणार का? असा प्रश्न महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नागपूरमध्ये विचारण्यात आला. तेव्हा यावर टोपे यांनी सांगितलं की, कोरोना व्हायरसमुळे अनेक कार्यक्रम रद्द होताना दिसत आहेत. गर्दीच्या ठिकाणी अशा आजारांचा प्रसार होण्याच्या शक्यता आहे. यामुळे आयपीएल स्पर्धा नंतर घेतली तरी चालू शकते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यासंदर्भातील बोलणी सुरू केली आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.'
याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितलं की, 'आयपीएल नियोजित वेळेत होईल. बीसीसीआयकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल.'
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे जगभरात ३५०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर १ लाखाहून अधिक नागरिक या व्हायरसने बाधित आहेत. जगभरातील ८० हून अधिक देशात याचा फैलाव झाला आहे. भारतामध्ये ३३ हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे.
हेही वाचा - भारताच्या कर्णधाराचा 'हा' व्हिडिओ सोशल मीडियावर ठरतोय तुफान हिट!
हेही वाचा - महिला टी-२० विश्वकरंडक : 'नशिबाची साथ भारताच्याच बाजूने...'