नवी दिल्ली - दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने रविचंद्रन अश्विनचे सध्याचा 'सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर' म्हणून वर्णन केले आहे. हे दोन्ही खेळाडू इंस्टाग्रामवरील व्हिडिओ सत्रात बोलत होते. तेव्हा दोघांनी मैदानाच्या आतील आणि बाहेरील बाबींवर चर्चा केली. हे संभाषण संपवताना हरभजनने अश्विनचे कौतुक केले.
हरभजन म्हणाला, "काळजी घे कारण येत्या काळात भारतीय संघाला तुझी गरज आहे. तुला अजून अनेक विक्रम मोडायचे आहेत. बर्याच लोकांना असे वाटते की मला तुझा हेवा वाटतो. ते असा विचार करू शकतात. पण तू सध्याचा सर्वोत्कृष्ट ऑफ स्पिनर आहेस."
ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लिऑनचेही हरभजनने कौतुक केले. "मला नॅथन लिऑनही आवडतो. मी नेहमीच त्याला सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये स्थान दिले आहे. तो ऑस्ट्रेलियात खेळतो आणि तेथे गोलंदाजी करणे खूप अवघड आहे", असे भज्जी म्हणाला.
कसोटी क्रिकेटमधील हरभजनच्या विक्रमाच्या जवळ अश्विन येऊन पोहोचला आहे. हरभजनने 103 सामन्यांत 417 बळी घेतले आहेत तर अश्विनने आतापर्यंत 71 कसोटीत 365 बळी घेतले आहेत.