मुंबई - भारतीय क्रिकेटमध्ये खेळाडूंना निरोपाचा सामना देण्याचा मुद्दा नेहमीच महत्वाचा राहिला आहे. प्रत्येक खेळाडूला निरोपाचा सामना मिळावा, अशी इच्छा असते. परंतू सर्वांना ही संधी मिळत नाही. भारताचा दिग्गज ऑफस्पिनर हरभजन सिंगने याविषयी प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत हरभजनने काही खेळाडूंचा उल्लेख केला ज्यांना मैदानात उत्तम निरोप मिळाला पाहिजे हवा होता.
यूट्यूब चॅनलवर आकाश चोप्राशी बोलताना हरभजन म्हणाला, ''वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण या खेळाडूंना उत्तम निरोप मिळायला हवा होता. जर आपणच आपल्या खेळाडूंचा सन्मान केला नाही तर कोणी बाहेरचे करणार नाहीत. जसे माझ्यासोबत झाले तसे कोणासोबत होऊ नये, अशी निराशा त्याने व्यक्त केली.''
भारताकडून 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार्या 39 वर्षीय हरभजनने मर्यादित षटकांच्या स्वरूपात 294 बळी घेतले आहेत. त्याने 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला, तर त्याचवर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अखेरचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
तो म्हणाला, ''गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे हाताळल्या गेल्या असत्या. याबद्दल मला नेहमी वाईट वाटते. 100 कसोटी सामने खेळणे ही कोणत्याही खेळाडूसाठी मोठी गोष्ट असते. मी भाग्यवान आहे. मी सहमत आहे की कदाचित माझी कामगिरी थोडीशी घसरली असेल किंवा मी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नसेन. परंतु गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे हाताळल्या गेल्या असत्या. मी 400 बळी पूर्ण करून वेस्ट इंडिजकडून परतलो. तेव्हा कोणीही माझ्याशी बोलायला आले नाही. त्यानंतर मला कसोटी संघातून वगळण्यात आले आणि मला पुन्हा कधी निवडले गेले नाही. '
भारताकडून हरभजनने 417 कसोटी बळी घेतले आहेत. अनिल कुंबळे आणि कपिल देव यांच्यानंतर तो भारताचा तिसरा यशस्वी गोलंदाज आहे.