जोहान्सबर्ग - क्रिकेट दक्षिण आफ्रिकाचा (सीएसए) संचालक ग्रॅमी स्मिथने सौरव गांगुलीला आयसीसी प्रमुख होण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे. काही दिवसांपूर्वी, इंग्लंडचे माजी कर्णधार डेव्हिड गोव्हर यांनी सौरव गांगुलीचे कौतुक करत त्याच्याकडे आयसीसीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता असल्याचे म्हटले होते.
स्मिथ म्हणाला, "मला वाटते की नेतृत्व करणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आज ज्या आव्हानांना आपण तोंड देत आहोत त्यांना सामोरे जाण्यासाठी चांगले नेतृत्त्व असणे गरजेचे आहे. गांगुलीसारखा व्यक्ती क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल. त्याला खेळाविषयी माहिती आहे. तो प्रचंड अनुभवी आहे.'' नव्या घटनेनुसार बीसीसीआय अध्यक्षपदाचा गांगुलीचा कार्यकाळ जूनमध्ये संपेल.
काही दिवसांपूर्वी गोव्हर यांनीसुद्धा गांगुलीविषयी प्रतिक्रिया दिली होती. "मी तुम्हाला सौरवबद्दल काय सांगू. मी त्याच्याशी बर्याच वेळा बोललो आहे. तो नक्कीच एक उत्तम खेळाडू होता आणि त्याचे विक्रम त्याची कहाणी सांगतात. गेल्या काही वर्षात मला काही गोष्टी समजल्या आहेत. आपल्याला बीसीसीआय चालवायचे असेल तर आपल्याला सर्वकाही आवश्यक आहे. त्याच वेळी तुम्ही एक कुशल राजकारणी असायला हवे. बर्याच गोष्टींवर नियंत्रण ठेवता आले पाहिजे", असे गोव्हर यांनी म्हटले होते.
सध्या बीसीसीआयसमोर आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याचे आव्हान असणार आहे. हा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठा फटका बसू शकतो.