नवी दिल्ली - माजी भारतीय फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्रा सुरेश रैनाच्या निवृत्तीमुळे आश्चर्यचकित झाला आहे. १५ ऑगस्टला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ''तू शाहिद आफ्रिदी हो आणि निवृत्तीचा निर्णय मागे घे'', असे आकाश चोप्राने म्हटले आहे. मागील दहा वर्षांत आफ्रिदीने चार वेळा निवृत्ती जाहीर करून नंतर पुनरागमन केल्याचे क्रिकेटविश्वाने अनुभवले होते.
आकाश म्हणाला, "माझा विश्वास आहे की २०२० आणि २०२१ च्या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी करून रैना टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात सामील होऊ शकला असता. हे शक्य आहे. माझा विश्वास आहे की हे शक्य आहे. रैना अधिक खेळू शकला असता. त्याला निवृत्तीची गरज नव्हती. तो आता ३३ वर्षांचा आहे. हो, मला हे मान्य आहे की दुखापत ही समस्या होती. पण कोणत्या खेळाडूला हा प्रश्वन उद्भवत नाही. शस्त्रक्रियेनंतर तो तंदुरुस्त आणि मजबूत होता. मला वाटते रैना मैदानात परत येण्यास उत्सुक होता. "
तो पुढे म्हणाला, "धोनीचे प्रकरण मी समजू शकतो. जर आयपीएल एप्रिल-मेमध्ये असते आणि टी-२० विश्वकरंडक स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये असती तर धोनी संघात सामील झाला असता. परंतु टी-२० विश्वकरंडक स्पर्धा पुढे ढकलली गेल्यामुळे धोनीने हा निर्णय घेतला असावा. खरे सांगायचे तर रैनाला अशी कोणतीही समस्या नव्हती."
आयपीएलच्या २०२० च्या मोसमात रैना आणि धोनी चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहेत. आयपीएलचे तेरावे पर्व १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान यूएईत रंगणार आहे.