साउथम्प्टन - इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल वॉनने फलंदाज जो डेन्लीविषयी भाष्य केले आहे. जो रूट जेव्हा संघात परतेल, तेव्हा त्याने डेन्लीव्यतिरिक्त जॅक क्रॉलेला पुन्हा संधी द्यावी. डेन्लीने विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 29 चेंडूत 18 धावा केल्या होत्या. मागील आठ डावांमध्ये त्याला एकही अर्धशतक करता आलेले नाही.
रूटच्या अनुपस्थितीत बेन स्टोक्स विंडीजविरूद्धच्या पहिल्या कसोटी इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. इंग्लंडसाठी 51 कसोटी सामन्यांचे कर्णधारपद भूषवलेला वॉन म्हणाला, "ही चर्चेची बाबदेखील नाही. 15 कसोटी सामने खेळल्यामुळे डेन्ली खूप भाग्यवान आहे. इथे असे बरेच खेळाडू आहेत, ज्यांनी फक्त आठ सामने खेळले आहेत आणि शतकेही केली आहेत. त्याने आपली संधी गमावली आहे. परंतु संघाने क्रॉलेला अधिक संधी द्याव्यात. डेन्लीसाठी खेद आहे. तो इतकाही चांगला नाही. इंग्लंडने डेन्लीबद्दल विचार केला पाहिजे आणि पुढचा सामना क्रॉलेने खेळायला हवा.''
कोरोनामुळे मार्चच्या मध्यापासून क्रिकेट बंद होते. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघातील कसोटी मालिकेतून क्रिकेट परतले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना बुधवारपासून सुरू झाला. तथापि, कोरोनाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही बदल केले आहेत, त्यानुसार ही मालिका रिकाम्या स्टेडियममध्ये प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.