नवी दिल्ली - भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने आज वयाच्या ३९व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजच्या या खास दिवशी अनेक चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. मात्र, युवीने एका पत्राद्वारे सर्वांची माफी मागितली.
हेही वाचा - योगराज सिंग पुन्हा चर्चेत...दिग्दर्शकाने केली चित्रपटातून हकालपट्टी
युवीने वडील योगराज सिंग यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. योगराज सिंह यांनी शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ हिंदूंबद्दल वादग्रस्त भाष्य केले होते. यामुळे बरीच खळबळ उडाली होती. योगराज यांच्या अटकेची मागणीही सोशल मीडियावर करण्यात आली. आता युवराजने वडिलांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. ''या प्रकरणात माझी विचारसरणी वडिलांशी जुळत नाही'', असे युवीने सांगितले.
योगराज सिंग यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल -
शेतकरी आंदोलनादरम्यान योगराज सिंग यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ सोशल माध्यमात प्रचंड व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये योगराज सिंग 'हिंदूंना गद्दार' म्हणत आहेत. इतकेच नव्हे तर त्यांनी महिलांबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे. अनेकांनी योगराज यांच्या भाषणाला निंदनीय, दाहक, अपमानजनक आणि द्वेषपूर्ण म्हटले आहे. योगराज यांचे हे वक्तव्य पंजाबी भाषेत आहे. काही वर्षांपूर्वी, युवराज सिंगला संघात स्थान न मिळाल्याने योगराज यांनी महेंद्रसिंह धोनीबद्दल वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला होता.
युवराज आणि क्रिकेट -
१२ डिसेंबर १९८१ रोजी चंदीगढमध्ये युवराजचा जन्म झाला. टी-२० क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा षटकार ठोकण्याचा विक्रम युवीच्या नावे आहे. युवीने टी-२० क्रिकेटमध्ये तर आपली छाप सोडलीच पण त्याआधी त्याने एकदिवसीय सामन्यात अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. युवराजने भारताकडून ३०४ एकदिवसीय सामने, ४० कसोटी आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे ८७०१, १९००, ११७७ धावा केल्या आहेत.