केप टाऊन - भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने संघाच्या फलंदाजीसाठी सहाय्यक प्रशिक्षक निवडला आहे. आफ्रिकेचा माजी खेळाडू लान्स क्लुजनर याला फलंदाजीचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे.
![former cricketer lanse klusner will fill the role of south africa assistant batting coach for the t20 Series](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/eclzaa8xsaab48c_2308newsroom_1566549640_224.jpg)
आफ्रिकेचा स्फोटक खेळाडू म्हणून लान्स क्लुजनरची ओळख होती. त्याने १९९९ च्या विश्वकरंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या नियुक्तीबद्दल आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी निर्देशक कोरी वेन म्हणाले, 'क्लुजनर फक्त टी-२० मालिकेसाठी सहाय्यक प्रशिक्षक असेल. तो अष्टपैलू खेळाडू राहिला आहे. शिवाय त्याला लीग स्पर्धेतील प्रशिक्षकपदाचा अनुभवही आहे.'
आफ्रिकेचे माजी प्रशिक्षक ओटीस गिब्सन यांच्या हकालपट्टीनंतर एनॉच नक्वे यांना संघाचे हंगामी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर क्लुजनर यांची निवड झाली. क्लुजनरने ४९ कसोटी, १७१ वन-डे सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. क्लुजनर यांच्या सोबत विंसेट बार्न्स यांची गोलंदाजीच्या तर, जस्टीन ऑनटाँग यांची क्षेत्ररक्षणाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सप्टेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघात तीन कसोटी आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. १५ सप्टेंबरपासून आफ्रिका आणि भारतामध्ये टी-२० मालिकेला सुरुवात होईल.