मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा 17 वर्षानंतरही तसाच असल्याचे मत यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने दिले आहे. 2003-04 मध्ये भारतीय 'अ' संघाच्या पहिल्या दौऱ्यावेळी कार्तिक आणि धोनीची भेट झाली होती.
एका कार्यक्रमात कार्तिकने धोनीच्या शांत स्वभावाची माहिती दिली. तो म्हणाला, '2003-04 मध्ये मी जेव्हा माझ्या पहिल्या भारत 'अ' संघासोबत दौऱ्यावर गेलो तेव्हा धोनी मला शांत, सहज स्वभावाचा वाटला. आज त्याचे केस पांढरे झाले असले तरी तो आतून शांत आहे. मी त्याला गंभीर किंवा रागावलेला पाहिले नाही. तो त्याच्या भावना जास्त व्यक्त करत नाही. आजही तो तसाच आहे.'
कार्तिक व्यतिरिक्त न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही धोनीच्या शांत व्यक्तिमत्त्वाचे स्वागत केले. तो म्हणाला, 'काय महत्त्वाचे आहे हे त्याला माहित आहे. विचलित करणाऱ्या गोष्टींना तो दूर ठेवतो. तो एक खास व्यक्ती आहे.'
धोनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सध्या कोरोनाचे सावट आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएल विसरा, असे सूचक संकेत दिले आहे. आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास धोनीचे भवितव्य अंधारात आहे. आजही धोनीच्या निवृत्तीविषयी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत. पण धोनीने अद्यापही याविषयी कोणतेही संकेत दिलेले नाही.