कोलकाता - पश्चिम बंगालचे क्रीडामंत्री आणि माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्लाने कोरोनाविरूद्धच्या लढाईत आपले पाऊल टाकले आहे. शुक्लाने आपल्या पाच महिन्यांच्या आमदार वेतन आणि बीसीसीआयच्या निवृत्तीवेतनातून ही मदत जाहीर केली आहे.
या व्यतिरिक्त त्याने मैदानातील कर्मचार्यांना भात आणि डाळीचे वाटप करत मदत दिली आहे. ‘१९९९ मध्ये मी कारगिल युद्धावेळी दान देऊन केंद्र सरकारला मदत केली. आता मी एक मंत्री तसेच या देशाचा जबाबदार नागरिक आहे. म्हणूनच आज मला कर्मचार्यांना तांदूळ व डाळ वाटून त्यांची मदत करायची आहे’, असे शुक्लाने एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
कोरोना व्हायरसने सध्या जगभरात धुमाकूळ घातला असून क्रीडाक्षेत्रालाही या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. या व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी अनेकजण पुढे सरसावले आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरही या लढाईत मागे राहिलेला नाही. सचिनने कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.