नवी दिल्ली - अफगाणिस्तान संघाच्या तिन्ही फॉर्मेटचा कर्णधार असलेला अव्वल फिरकीपटू राशिद खान आयपीएलच्या नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. राशिद या हंगामामध्ये त्याच्या लोकप्रिय 'कॅमल बॅट'सह दिसणार आहे. राशिदने ईटीव्ही भारत सोबत केलेल्या खास मुलाखतीदरम्यान या माहितीचा उलगडा केला. लवकरच, राशिद सनरायझर्स हैदराबादच्या सराव शिबीरात सामील होणार आहे.
हेही वाचा - माहीची अग्निपरीक्षा..! भारतीय संघात पुनरागमनासाठी धोनीपुढे बीसीसीआयने ठेवली 'ही' अट
आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेगवान १०० बळी नोंदवण्याच्या विक्रमाबाबत राशिदने आपले मत दिले. राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून अनुभव कसा होता याबाबतही त्याने दिलखुलास उत्तर दिले. शिवाय त्याने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी कोणकोणच्या उपाययोजना केल्या याची माहितीही दिली.
'आयपीएल खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत इतक्या लोकांसमोर चांगली कामगिरी करणे खूप महत्वाचे असते. तुम्हाला खूप काही शिकायला मिळते. मी जेव्हापासून आयपीएल खेळायला लागलोय, माझ्यामध्ये फार बदल झाले आहेत', असे राशिदने म्हटले आहे.
'कॅमल बॅट'ची कथा काय आहे?
'जिथे मी काउंटी क्रिकेट खेळत होतो, त्या ठिकाणी एक कारखाना होता. मी तिथे गेलो. त्या कारखान्यातील एका व्यक्तीने मला या बॅटची कल्पना दिली. 'तुम्ही जेव्हा संघाच्या तळाशी फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला यॉर्करता सामना करावा लागतो. या बॅटमुळे तुम्ही यॉर्कर खेळण्यास सक्षम आहात', असे त्याने मला सांगितले होते. मी या बॅटचा वापर बिग बॅशमध्ये केला. आणि मी आयपीएलमध्येही या बॅटने खेळणार आहे. मी २५ मार्चपर्यंत सनरायझर्स हैदराबाद सरावात सामील होणार आहे', असे राशिदने म्हटले.