मँचेस्टर - इंग्लंडविरुद्धचा अखेरचा तिसरा टी-२० सामना जिंकत पाकिस्तानने मालिका १-१ अशी बरोबरीत राखली. रोमांचक सामन्यात पाकने ५ धावांनी इंग्लंडचा पराभव केला. वहाब रियाजने १९ व्या षटकात अवघ्या ३ धावांत दोन गडी बाद करत सामना पाकच्या बाजूने फिरवला. दरम्यान, पाकने इंग्लंड दौऱ्याचा शेवट विजयाने केला आहे.
मँचेस्टरच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात पाकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९० धावा केल्या. यात अनुभवी फलंदाज मोहम्मद हाफिज आणि हैदर अली यांनी अर्धशतकं ठोकली. हाफिजने ५२ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ८६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. दुसऱ्या बाजूने हैदर अलीने ३३ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या. पाकचे १९१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही.
शाहीन आफ्रिदीने पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर जॉन बेअरस्टोचा (०) त्रिफाळा उडवत पहिले यश मिळवून दिले. यानंतर दुसऱ्या टी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा डेविड मलानचा (७) अडथळा इमाद वशीमने दूर केला. कर्णधार इयॉन मॉर्गन आणि टॉम बॅटन यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण चुकीच्या कॉलमुळे मॉर्गन (१०) धावबाद झाला. मॉर्गन पाठोपाठ टॉम बॅटनही (४६) माघारी परतला. त्याला हरिस रऊफने पायचित केले.
मोईन अली आणि सॅम बिलिंग्ज यांनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी केली. मोईन अलीने पाकच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. ही जोडी इंग्लंडला विजय मिळवून देणार असे वाटत असताना वहाबने सॅमला इमाद वसीमकडे झेल देण्यास भाग पाडले आणि जमलेली जोडी फोडली. सॅमने २६ धावा केल्या.
एकीकडे गडी बाद होत असताना मोईन अलीने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने यादरम्यान आपले अर्धशतक पूर्ण केले. मोक्याच्या क्षणी लेविस बाद झाला. त्याला शाहीन आफ्रिदीने बाद केले. १९ वे षटक सामन्याला कलाटणी देणारे ठरले. वहाब या षटकात पहिल्यादा ख्रिस जॉर्डनला धावबाद केले. यानंतर फटकेबाजी करत असलेल्या मोईन अलीचा अडथळा दूर केला. मोईन अलीने ३३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. या षटकात वहाबने ३ धावा देत २ गडी बाद केले.
अखेरच्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर १२ धावांची गरज होती. तेव्हा पाचव्या चेंडूवर टॉम करेनने हरिस रऊफला षटकार खेचत सामन्यात रंगत आणली. पण शेवटच्या चेंडूवर रऊफने करेनला धावा काढू दिल्या नाहीत. पाकने हा सामना ५ धावांनी जिंकला. सलग दोन अर्धशतके ठोकणाऱ्या मोहम्मद हाफीजला सामनावीर आणि मालिकावीर घोषित करण्यात आले. दरम्यान, इंग्लंड दौऱ्यात पाकने पहिल्यादा ३ सामन्यांची कसोटी मालिका १-० ने गमावली यानंतर टी-२० मालिका बरोबरीत राखण्यात यश मिळवले.