मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असेलेल्या निर्णायक कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने वेस्ट इंडिजविरूद्ध जोरदार मुसंडी मारली आहे. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने 4 गड्यांच्या मोबदल्यात 258 धावांपर्यंत मजल मारली आहे. 3 कसोटी सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे.
विंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विंडीजचा वेगवान गोलंदाज केमार रोचने सिब्लेला शून्यावर पायचीत पकडत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर कर्णधार जो रुट आणि रोरी बर्न्स यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 17 धावांवर रूट माघारी परतला. तर, बर्न्सने 57 धावा केल्या.
या मालिकेत भन्नाट फॉर्मात असलेला बेन स्टोक्स २० धावा काढून बाद झाला. त्यानंतर, ओली पोप आणि जोस बटलर यांनी विंडीजच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दिवसअखेरीस पोप नाबाद 91 तर बटलर नाबाद 56 धावांवर खेळत होता. पोपने आपल्या खेळीत 11 चौकार तर, बटलरने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले. विंडीजकडून केमार रोचने 2 तर रोस्टन चेसने एक बळी घेतला.