साऊथम्प्टन - पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीच्या शानदार नाबाद शतकी खेळीनंतरही पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी फॉलोऑनला सामोरे जावे लागले. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७३ धावा करू शकला. इंग्लंडकडे अद्याप ३१० धावांची आघाडी आहे.
पाकिस्तानकडून अझर अलीने २१ चौकारांच्या मदतीने २७२ चेंडूत नाबाद १४१ धावा फटकावल्या. याशिवाय त्याने सहाव्या विकेटसाठी मोहम्मद रिझवानसोबत (५३) १३८ धावांची भागीदारी रचली. मात्र, या दोघांशिवाय कोणताही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर उभा राहू शकला नाही. इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ५६ धावा देऊन ५ बळी घेतले. कारकिर्दीत त्याने २९ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेतले आहेत. अँडरसनच्या नावावर आता ५९८ कसोटी बळी जमा आहेत. याव्यतिरिक्त, स्टुअर्ट ब्रॉडने दोन, तर ख्रिस वोक्स आणि डोमिनिक बेस यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ८ बाद ५८३ धावा केल्या आहेत. या डावात इंग्लंडकडून जॅल क्रॉलेने २६७ तर, जोस बटलरने १५२ धावांची दमदार खेळी केली.