अहमदाबाद - भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी मैदानात उतरताच इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली. त्याचा टी-२० कारकिर्दीतील हा १००वा सामना आहे. टी-२० क्रिकेटमध्ये १००वा सामना खेळणारा तो जगातील चौथा तर इंग्लंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
मॉर्गनच्या आधी पाकिस्तानचा शोएब मलिक (११६), भारताचा रोहित शर्मा (१०९), न्यूझीलंडचा रॉस टेलर (१०२) यांनी १०० हून अधिक सामने खेळली आहेत. शोएबच्या नावे सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विक्रम आहे.
मॉर्गनने २००९ मध्ये टी-२० विश्वकरंडकादरम्यान, नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केलं होते. त्याने ९९ टी-२० सामन्यात १३९ च्या स्ट्राईट रेटने आणि ३०.३४ च्या सरासरीने २ हजार ३०६ धावा केल्या आहेत. यात १४ अर्धशतकांचा समावेश आहेत. तर ११३ षटकार मॉर्गनने खेचले आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा टी-२० सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगला आहे. उभय संघातील मालिका १-१ ने बरोबरीत आहे. आजचा सामना जिंकून दोन्ही संघ पाच सामन्याच्या मालिकेत आघाडी घेण्यासाठी उत्सुक आहेत. इंग्लंड कर्णधार इयॉन मॉर्गनने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अहमदाबादसह गुजरातमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे गुजरात क्रिकेट असोसिएशनने उभय संघातील उर्वरित सामने विनाप्रेक्षक खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, आजचा सामना विनाप्रेक्षक होत आहे.
हेही वाचा - क्रिकेटमध्ये पुन्हा 'मॅच फिक्सिंग', ICC ने केले २ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे निलंबन
हेही वाचा - सचिनच्या विश्वविक्रमी १००व्या शतकाची नववी वर्षपूर्ती, सहकार्यांनी केलं खास सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ