लंडन - नजीकच्या काळात वर्णद्वेषाविरूद्ध भूमिका घेणार असल्याचे इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) जाहीर केले आहे. कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर जगभरात वर्णद्वेषाविरोधात निषेध व्यक्त होत आहे. या विरोधात अनेक माजी आणि दिग्गज क्रिकेटपटूंनीही आवाज उठवला. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल कार्बरी आणि सध्याच्या कसोटी संघाचा सदस्य जेम्स अँडरसननेही याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली होती.
ईसीबीने निवेदनात म्हटले, “आम्ही क्रिकेट, क्रीडा आणि समाजातील कृष्णवर्णीय लोकांकडून त्यांचे अनुभव ऐकले. या महत्त्वाच्या विषयावर खुलासा केल्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो. संपूर्ण देशात विविध ठिकाणी वर्णद्वेष केला जातो. यापासून क्रीडाक्षेत्रही लांब राहिलेले नाही.''
ते पुढे म्हणाले, "आम्हाला माहित आहे की क्रिकेट सर्वांसाठी आहे. परंतू, या खेळाचा आनंद अनेक समुदायांना घेता येत नाही. आम्ही देशातील अधिकाधिक लोकांपर्यंत क्रिकेट पोहोचवून प्रगती केली. या अडथळ्यावर मात करण्यासाठी आणि संपूर्ण खेळाची रचना बदलण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. या लोकांचा आवाज ऐकणे आवश्यक आहे. आपण स्वतःला शिक्षित केले पाहिजे. कटू सत्य स्वीकारले पाहिजे, जेणेकरून अंतर्गत आणि खेळाच्या मोठ्या बदलांचे आपण साक्षीदार होऊ शकू.''
वाचा नक्की प्रकरण काय -
जॉर्ज फ्लॉइडला अटक करत असताना, एका पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरात वातावरण तापले आहे.